शास्तीकराविरोधात महापालिकेवर मोर्चा

सर्वपक्षीयांचा सहभाग  : शास्तीकराच्या नोटिसांची होळी

“रद्द करा, रद्द करा झिजिया कर रद्द करा, शास्ती कर माफ झालाच पाहिजे, अनियमित घरे नियमित झालीच पाहिजेत, घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे यासह रिंगरोड रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिल्या. संपूर्ण मोर्चामध्ये सुरू असलेल्या घोषणा महापालिकेच्या भवनातही देण्यात आल्या.

पिंपरी – महापालिकेने शास्तीकराच्या विरोधात बजाविलेल्या नोटीसा मागे घेण्याबरोबरच संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमीत बांधकामे नियमित करावे यासह विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला. आकुर्डीहून निघालेला मोर्चा महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पोहोचल्यानंतर शास्तीकराच्या नोटीसांची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

शहरातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपाने आजपर्यंत नागरिकांची दिशाभूल करून केवळ प्रश्‍न सोडविल्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र शहरतील सर्व प्रश्‍न जैसे थे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षासह शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर हा मोर्चा पोहोचला. यावेळी शास्तीकराच्या नोटीसांची होळी करून “बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात आले. यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के परतावा, बफर झोन हे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन देवून भाजपाने सत्ता काबिज केली. मात्र सत्तेत आल्यानंतर या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना लाखो रुपयांच्या नोटीसा बजाविल्या आहेत. जनतेच्या भावनांचा विचार न करता केवळ प्रश्‍न सोडविल्याचा आव सत्ताधाऱ्यांकडून आणला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा खोटी आश्‍वासने दिली जात आहेत.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी एकही प्रश्‍न सोडविला नाही. शास्तीकराच्या नावाखाली महापालिका खंडणी वसूल करत आहेत. यानंतर संदीप बेलसरे, सचिन चिखले, मारुती भापकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणे झाली. मोर्चामध्ये विलास लांडे, दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर अपर्णा डोके यांच्यासह वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, विनया तापकीर, मयूर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, संजय वाबळे, संगीता ताम्हाणे, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)