महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी नाना काटे यांच्या नावाची घोषणा

विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांची घोषणा शुक्रवारी (दि. 25) राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही निवड करण्यात आली आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपला कार्यकाळ संपल्यामुळे 9 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. यानंतर या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये तीव्र स्पर्धा रंगली होती. या पदासाठी नाना काटे यांच्यासह जावेद शेख, वैशाली घोडेकर, राजू मिसाळ आणि अजित गव्हाणे स्पर्धेत होते. सर्वच स्पर्धक तगडे असल्याने गेल्या आठवडाभर निवडीचा विषय राष्ट्रवादीच्या पातळीवर चांगलाच चर्चेचा बनला होता.
यापूर्वी पिंपरी आणि भोसरी विधानसभेतील नगरसेवकाला यापदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे चिंचवड विधानसभेतून नाना काटे यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती, अखेर ती खरी ठरली.

नाना काटे यांचा महापालिकेतील दांडगा अनुभव आहे. त्यातच सर्वांना सांभाळून घेणारे नेते व राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख त्यांची आहे. त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात “आयटीयन्स’ रहिवाशी असून, या मतदाराबरोबरच उच्चभ्रू मतदार राष्ट्रवादीकडे वळविण्यासही ही नियुक्ती फायदेशीर ठरणार आहे. नाना काटे यांच्या निवडीच्या ठरावावर सूचक म्हणून जावेद शेख यांची स्वाक्षरी असून, अनुमोदक म्हणून मोरेश्‍वर भोंडवे यांची स्वाक्षरी केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.