पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आज (शुक्रवारी ) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 497 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद असेल अशी अपेक्षा शहरवासियांना होती.
मात्र तशा तरतुदींचा स्पष्ट अभाव दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे 40 वे अंदाजपत्रक होते. तर नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांचे हे दुसरे अंदाजपत्रक होते. मात्र महापालिका आयुक्त राजेश पाटील हेच अंदाजपत्रक सादर करण्यासाठी उपस्थित नव्हते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2022-23 या वर्षाचे अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कलम 95 नुसार स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड नितीन लांडगे यांच्याकडे सादर केले. महापालिकेचे एकूण 4 हजार 961 कोटी व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह 6 हजार 497 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.
सन 2020-21 चे 6 हजार 628 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. तर 2021-22 चे 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचे अंदाजपत्रक होते. त्यामध्ये यावर्षी 627 कोटी रुपयांची घट करण्यात आली आहे.