नवी दिल्ली – यष्टीरक्षक फलंदाज आदीत्य तरेचे दमदार शतक व भरात असलेल्या पृथ्वी शॉ याच्या 73 धावांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशचा 6 गडी राखून पराभव केला व विजेतेपदाला गवसणी घातली.
सलामीवीर माधव कौशिकचे नाबाद दीडशतक व समर्थसिंग आणि आकाशदीप नाथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 312 धावा उभारल्या. माधव कौशिक व सम्राट सिंग यांनी 122 धावांची सलामी दिली. माधव कौशकने 15 चौकार व 4 षटकारांच्या जोरावर नाबाद 158 धावांची खेळी केली. समर्थसिंग व आकाशदीप नाथ यांनी प्रत्येकी 55 धावा केल्या.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना यंदाच्या स्पर्धेतील भरात असलेला मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने केवळ 39 चेंडूंत 10 चौकार व 3 षटाकारांच्या जोरावर 73 धावांची खेळी केली. स्थिरावल्यानंतरही तो बाद झाला मात्र, आदित्य तरेने दमदार शतक फटकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तरेने 18 चौकारांसह नाबाद 118 धावांची खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वाल, शम्स मुलाणी व शिवम दुबे यांनी उपयुक्त फलंदाजी करत सुरेख साथ दिली. गेल्या काही मोसमांपासून मुंबईची कामगिरी अत्यंत सुमार होत होती. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीकाही सुरू होती. मात्र, या स्पर्धेतील विजेतेपदाने मुंबईने या टीकेला पूर्णविराम दिला आहे.
दुखापतीनंतरही पृथ्वीची आक्रमक खेळी
मुंबईचा भरात असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ याला पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना नडगीला चेंडू लागल्याने दुखापत झाली. त्याला त्वरीत मैदानाबाहेर नेण्यात आले. उत्तर प्रदेशची फलंदाजी सुरू असताना 24 व्या षटकांत प्रशांत सोळंकीच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात माधव कौशिक याने फटकावलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात पृथ्वीच्या डाव्या पायाच्या नडगीला चेंडू जोरात लागला. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो फलंदाजीलाही उतरला व आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 39 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 73 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक – उत्तर प्रदेश – 50 षटकांत 4 बाद 312 धावा. (माधव कौशिक नाबाद 158, समर्थसिंग 55, आकाशदीप नाथ 55, तनुष कोटियन 2-54). मुंबई – 41.3 षटकांत 4 बाद 315 धावा. (पृथ्वी शॉ 73, शिवम दुबे 42, शम्स मुलाणी 36, यशस्वी जयस्वाल 29, आदीत्य तरे नाबाद 118, सर्फराज खान नाबाद 3, समिर चौधरी 1-43, शिवम मावी 1-63, यश दयाळ 1-71, शिवम शर्मा 1-71).