पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवडहुन थेरगावकडे पवना नदीतून येत असताना दोन तरुण बुडाले. तर दोघांना वाचवण्यात यश आले. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. १४) सायंकाळी घडली. पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.
रवी राजकुमार गायकवाड (वय 13), नर्सिंग महादेव जाधव (वय 21), अशी बचावलेल्या तरूणांची नावे आहेत. तर पिंटू विठ्ठल गायकवाड (वय 35) आणि ओम प्रकाश जाधव (वय 25, सर्व रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉलनी, काळेवाडी) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. अग्निशामक दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चारही तरुण क्रिकेट खेळून नदी पात्र जवळून थेरगावकडे येत होते. त्यावेळी पाठीमागून कोणीतरी पळा पळा असा आवाज दिला. यामुळे त्या चारही तरुणांनी नदीत उडी मारली. त्यामध्ये दोन जणांना वाचवण्यात यश आलं. तर उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.
तर काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारही तरुण पत्ते खेळत बसले होते मात्र पोलीस आल्याचे कोणीतरी सांगितल्यामुळे या तरुणांनी नदीपात्रातून थेरगावकडे धाव घेतली. यावेळी दोघेजण बुडाले.
दोघेजण नदीपात्रात बुडालेल्याची माहिती पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलास देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या त्या दोन तरुणांचा शोध लागलेला नाही.