मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी वकील जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जयश्री पाटील या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संपावर असलेल्या 100 हून अधिक कर्मचार्यांच्या गटाने पवार यांच्या दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाबाहेर उग्र आंदोलन केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी चपला तसेच दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं?
राज्य परिवहन कर्मचार्यांच्या एका गटाने 8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. यावेळी त्यांनी पवार यांच्या निवासस्थानात प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगड आणि चप्पल फेकून निषेध केला.
विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन महामंडळाच्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितलं होत. न्यायालयाच्या या निकालाचे एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत देखील केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एमएसआरटीसी कर्मचारी ऑक्टोबरच्या अखेरीपासून आंदोलन करत आहेत.