नागपूर : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.
ॲड.नार्वेकर म्हणाले, दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळ आणि दृष्टी महिला मंचच्या संस्थापिका म्हणून काम केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या. सन 2019 मध्ये कसबा मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून आल्या होत्या.
लोकप्रतिनिधींनी पक्षनिष्ठा आणि कर्तव्य कसे बजावावे याचे त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. आजारी असताना सुद्धा त्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असत.
अशा निष्ठावान, कर्तृत्ववान लोक प्रतिनिधींच्या निधनाने केवळ पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात ॲड. नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.