पुणे – भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापैर मुक्ता टिळक अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 23) दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शाशकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुक्ता टिळक यांचे काल (दि. 22) दीर्घ आजाराने निधन झाले होते. मागील पाच महिन्यापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर गुरुवारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. सकाळी 9 ते 11 पुण्याच्या ऐतिहासिक केसरी वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यानंतर अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार करण्यात आले. टिळक यांच्या अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय लोटला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर उपस्थित होते. “मुक्ता टिळकांचं निधन आमच्यासाठी अत्यंत दुखाची बातमी आहे. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी चांगले काम केले. टिळकांचा वासरा त्यांनी चांगला निभावला. सामान्य कार्यकर्तीपासून मोठ्या पदावर स्वत:च्या मेहनतीने पोहचल्या. कल्पक आणि चांगल्या वक्त्या होत्या. त्या अर्ध्या वाटेत सोडून जातील असे वाटले नव्हते. राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी रुग्णवाहिकेतून त्या मतदानासाठी आल्या होत्या. पक्षाला आवश्यकता असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे निधन म्हणजे पक्षाची मोठी हानी आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांची पणतसून होत्या. त्यांनी 1992 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 17 वर्ष त्या नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौरही होत्या. त्यानंतर 2019 मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. अनेक वर्षांची मोठी राजकीय कारकीर्द असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या नेत्यांसह, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली होती. कुटुंबिय आणि राजकीय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते. त्यासोबतच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.