भोपाळ – केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना शनिवारी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागले. पुराचा तडाखा बसलेल्या रहिवाशांनी तोमर यांना घेराव घातला. तसेच, त्यांच्या वाहन ताफ्यावर चिखलफेक केली.
मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेशाच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्या पुराचा फटका तोमर यांच्या मुरैना मतदारसंघालाही बसला आहे. त्या मतदारसंघातील श्योपुरला तोमर यांनी भेट दिली. पूरग्रस्तांना धीर देण्याच्या उद्देशातून ते एका ठिकाणी पोहचले.
त्यावेळी रहिवाशांनी खूप उशीराने भेट दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तोमर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पुराविषयी आम्हाला सतर्क करण्यात आले नाही. वेळेत मदत पोहचली नाही. ते सगळे प्रशासनाचे अपयश आहे, अशा तक्रारी पूरग्रस्तांनी केल्या.
अखेर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे सरसावत तोमर यांना घेराव घालणाऱ्या पूरग्रस्तांपासून दूर नेले. प्रामुख्याने मध्यप्रदेशच्या उत्तर भागाला पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. त्या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध दुर्घटना घडून 24 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याशिवाय, हजारों लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे.