पुणे, दि. 19 – वीज पुरवठा खंडीत करायला गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मीटर रुममध्ये कोंडणाऱ्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सलीम बशीर सय्यद (वय 41, रा. मंगळवार पेठ) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 28 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.
मंगळवार पेठेतील सुखनिवास या एस. आर. ए. इमारतीत मंगळवारी (दि. 15 ) हा प्रकार घडला. सय्यद याचे 11 हजार 481 रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी त्याच्या घरातील विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे त्याने चिडून मीटर रूमच्या दरवाज्यासमोरुन फिर्यादींच्या अंगावर धावत गेला.
“आमची कट केलेली लाइट चालू कर, नाही तर मी तुला येथेच रुममध्ये कोंडून ठेवीन,’ असे धमकावले. त्या समजावून सांगत असताना मीटर रूमची बाहेरून कडी लावून फिर्यादी यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील ऑफिस असिस्टंट शैलेश धुमाळ यांना फोन करून बोलावून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली.
सय्यद याने त्यांनाही शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. त्याने एका सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणून त्यांना कोंडून ठेवले. हा गंभीर अपराध आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ऍड. बेंडभर यांनी केला.