पुणे – एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (रा. कोपरगाव, जि. नगर) उत्तीर्ण झाली होती. वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मात्र अचानक तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली.आता राहुलने पोलिसांना आपण केलेल्या हत्येचा कबुली जबाब दिला आहे.
दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. राहुलला अटक केल्यानंतर त्याने दर्शनाचा खून केल्याचे स्पष्ट झाले होते. आता राहुलने दिलेल्या कबुली जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
कबुलीजबाबत राहुल म्हणतो
दर्शना आणि मी एकत्र अभ्यास करायचो तेव्हा मी तिला प्रपोजही केलं होत. एमपीएससीच्या परीक्षेसाठी मी तिला मदत देखील केली होती असं यावेळी राहुलने म्हंटले आहे. तसेच परीक्षा पास झाल्यानंतर तिने मला नकार दिला आणि याच रागातून मी तिला संपवल्याचं आरोपी राहुलने यावेळी सांगितलं असल्याचे समजते.
१२ जूनला गडावर गेलो असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मी ब्लेडने तिच्यावर वार केले त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातल्याचे देखील यावेळी राहुलने कबुलीजबाबत म्हंटले आहे. यानंतर राहुल गडावरून एकटाच परतल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.
राहुल हंडोरे नेमका कोण आहे ?
राहुल हंडोरे गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याने अनेक परीक्षा देखील दिल्या आहेत. सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करून एका रूममध्ये राहत होता. राहुल आणि दर्शना लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.