मुंबई – कथित कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सूरज चव्हाण यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने आज जवळपास 8 तासाहून अधिक काळापासून त्यांची चौकशी केली. ईडीने सूरज चव्हाण यांच्या विरोधात पुरावे गोळा केले आहेत.
कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी छापे टाकले होते. दरम्यान या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच व्हॉट्सऍप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे.
याशिवाय जप्त करण्यात आलेल्या एका डायरीमध्येही पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी आढळल्या आहेत. यासंदर्भात ईडी संशयितांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये मध्यस्थींच्या सहभागाचे पुरावे देखील ईडीला सापडले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते. तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं देखील नाव समोर येत आलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून करण्यात येत आहे.