भोपाल: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रहली तहसीलच्या तिकिटोरिया मंदिरात चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका १२ वर्षाच्या मुलीला अटक केली. आणि तिला बाल न्यायालयात हजर केले. तिथून तिला बाल सुधारगृह शहडोल येथे पाठविण्यात आले आहे. मुलीने मंदिर दानपेटीतून अडीचशे रुपये केवळ दहा किलो गहू खरेदीसाठी काढले होते.
सदर मुलीचा आठ वर्षांचा भाऊ आणि सहा वर्षांची बहीण आहे. या तिन्ही भावांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे. त्यामुळे आपली मोठी बहीण आपली आई आहे, अशी भावना या दोन लहान भावांनी व्यक्त केली.
मंदिर व्यवस्थापनाच्या अहवालावर शनिवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बारा वर्षांच्या मुलीची चौकशी केली. त्या मुलीने दानपेटीतून पैसे काढल्याची कबुली दिली. मुलीच्या वडिलांनी तिची शाळेची बॅग पाहिल्यावर त्यामध्ये सत्तर रुपये मिळाले. तिने १८० रुपयाचे दहा किलो गहू घरी आणले होते.
या निरागस मुलीने वडिलांच्या भीतीने ही चोरी केली. सदर मुलगी गहू दळण्यासाठी पीठ गिरणीवर गेली होती. मात्र तिचे १० किलो गहू हरवले. घरी गेल्यावर वडिलांच्या रागाला घाबरून मुलीने गहू गिरणीवर ठेवल्याचे सांगून प्रकरण पुढे ढकलले. पण सत्य उघडकीस आल्यावर घाबरलेल्या मुलीने दुसर्या दिवशी गहू खरेदी करण्यासाठी पैसे उभे करण्याचा विचार केला आणि मंदिराच्या दानपेटीतून एकूण अडीचशे रुपये काढून घेतले.
इयत्ता सातवीत शिकणारी बारा वर्षाच्या मुलीवर ३ वर्षांपासून घरच्या स्वयंपाकाची जबाबदारी आहे. तीन वर्षापूर्वी प्रसूतीदरम्यान या मुलीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी स्वयंपाक करण्याची जबाबदारी घेतली होती. वडिल भाजी बनवायचे तर त्यांची मुलगी चपाती बनवायची.