मुंबई – महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची मालिका सध्या राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून सुरु आहे. यामुळे राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ,अमोल कोल्हे यांनी संसदेत याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माईक बंद करण्यात आला त्यानंतर कोल्हे यांनी सभागृहाबाहेरून व्हिडीओ करत आपला निषेध नोंदवला. आता कोल्हे यांनी पुन्हा एकदा आपल्या सोशल मिडीयावरून कवितेच्या मार्फत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यकर्त्यांचं भान सुटलं तरी जनतेला मात्र जाण आहे.. या शीर्षकाखाली खासदार कोल्हे यांनी एका कवितेद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत कोल्हेंनी मार्मिक आणि धारधार शब्दात आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या आहेत.
अमोल कोल्हे आपल्या कवितेमध्ये म्हणतात…
जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हारप्रत्येक
बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं
काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरु केलं?
प्रश्नासरशी
बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतले
पुतळ्यांनी तर शरमेनं तोंड लपवलं
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली…
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोषपूर्ण भाषण ठोकताना
अरेच्चा… हे तर तेच महोदय
हे तर ते, ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली
निषेध उद्वेग संताप,सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणून
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला..
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..
महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना
का जावं अकलेचे तारे तोडायला
समाधानाने पुस्तकं फडफडली
चला, आमच्या शब्दांमध्ये जान आहे
राज्यकर्त्यांचं भान सुटलं
तरी जनतेला अजून जाणा आहे.
VIDEO
राज्यकर्त्यांचे भान सुटलं तरी जनतेला मात्र जाण आहे..https://t.co/2SMKlFq5vb
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 10, 2022