नारायणगाव -साबळे आणि वाघिरे कंपनीच्या विडी उत्पादक कंपनीला विड्याच्या बंडलावर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रपुरुष व समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या नावाने अशाप्रकारे विड्यांची बंडलं बाजारात आणणे ही छत्रपती संभाजी महाराजांच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील जनतेचा अपमान आहे. आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या नावाचा व फोटोचा उपयोग करणे अजिबात समर्थनीय नाही.
त्यामुळे संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन विडीचे नाव बदलण्याची विनंती केली; परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडी उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विडी कंपनीला विडीचे नाव वापर करण्यास मनाई करण्याचे निर्देश तात्काळ द्यावेत, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.