केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
पुणे – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पाच प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे. नव्या धोरणातील लवचिकता संपूर्ण व्यवस्थेला एक नवीन आयाम देईल, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्ता वाढविणे हे या धोरणाचे सार आहे, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: उच्च- शिक्षणाची पुनर्रचना’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. सिम्बायोसिसचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण, सहज उपलब्धता, गुणवत्ता, समानता आणि जबाबदारीचे उत्तरदायित्व या पाच तत्त्वांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सर्व भागधारकांचा सहभाग घेऊन अधिक लोकशाही पद्धतीने या धोरणाची आखणी आणि मसुदा तयार केला आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक संधी निर्माण होतील. यासह शैक्षणिक संस्था, उद्योग आणि संशोधन प्रयोगशाळांमधील संवादांना प्रोत्साहन देऊन संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पना यावर लक्ष केंद्रित करतील, असे जावडेकर यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. मुजुमदार यांनी गतिशीलता आणि नावीन्यपूर्ण पद्धतीसाठी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बापट यांनी संशोधनाच्या अनुषंगाने नवीन धोरणाचे विश्लेषण केले. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील नावीन्य आणि सर्जनशीलता या पैलूंवर प्रकाश टाकला. सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. सुनायिनी परचुरे यांनी आभार मानले. तर डॉ. शरयु भाकरे यांनी वेबिनारचे आयोजन केले होते.