पुणे – भारतातील विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमधील खरेदीस मर्यादा आणण्याचा सरकार विचार करीत आहे. तसे झाले, तर आम्हाला या संदर्भातील फेरकरार करावा लागेल, असे रिटेलर्सनी सांगितले आहे. अशा स्टोअरमधून मद्य आणि सिगारेटची जास्त प्रमाणात विक्री होते.
सध्या भारतीय विमानतळावर आलेल्या परदेशी नागरिकांना 2 लिटर मद्य आणि 100 सिगारेटी ड्युटी फ्री शॉपमधून खरेदी करता येतात. मात्र वाणिज्य मंत्रालयाने केलेल्या नव्या शिफरशीनुसार प्रत्येक ग्राहकाला केवळ 1 लिटर मद्य खरेदी करता येईल, तर सिगरेट आजिबात खरेदी करता येणार नाही.
रिटेलर्सच्या संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, आमचा 70% धंदा हा येणाऱ्या प्रवाशांकडून तर 30 टक्के धंदा हा जाणाऱ्या प्रवाशांकडून होतो. त्यामुळे हा प्रस्ताव अंमलात आल्यानंतर आमच्या एकूणच उद्योगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आम्हाला या ड्युटी फ्री शॉपचे भाडे देणे परवडणार नाही. बिगर प्रवासी उत्पन्नात विमानतळांना ड्युटी फ्री शॉप मधून एकूण उत्पन्नाच्या 30 टक्के महसूल मिळतो.
त्यामुळे विमानाच्या तिकिटाचे दर कमी ठेवण्यास मदत होते. इतर देशातील विमानतळावर भारतापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये खरेदी करण्याची परवानगी दिली जाते असे रिटेलर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर भारतातील स्टोअरमधून होणारा धंदा इतर देशाच्या विमानतळवर होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या दोन बाबींचा वापर कमी व्हावा अशी सरकारची इच्छा असल्यामुळे खरेदीला मर्यादा आणण्यात येणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.