काबूल – अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट अधिकृतपणे सुरू झाली आहे. या राजवटीत अल कायदा पुन्हा एकदा उभी राहण्याची शक्यता आहे. अल कायदाशी संबंधित अनेक छोटे छोटे गट पुन्हा एकत्र यायला लागतील आणि हे गट येत्या 1-2 वर्षांत पुन्हा एकदा अमेरिकेविरोधात हल्ले करू शकतील, अशी शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बॅरियर यांनी ही शक्यता वर्तवली आहे.हे दहशतवादी गट मिळेल त्या सर्व स्रोतांचा उपयोग करून आणि आपली क्षमता पुन्हा वाढवण्यासाठी सर्व शक्य मार्गांचा अवलंब करून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा जम बसवतील, असे ले. जन. बॅरियर यांनी इंटिलिजन्स कॉन्फरन्समध्ये सांगितले.
अल कायदाच्या या प्रयत्नांना अटकाव करणे हे अमेरिकेचे प्राधान्य आहे. यापुढेही अमेरिकेचे हे प्राधान्य असणार आहे. मात्र, आता दहशतवाद्यांना मिळणाऱ्या या मदतीच्या स्रोतांबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.अमेरिकेच्या अफगाणिस्तान मोहिमेतून काहीही निष्पन्न झाले नसल्याची टीका केली जात आहे.
मात्र, अल कायदाचा सफाया करण्यात अमेरिकेला यश आल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातो आहे. अल कायदा संपवणे आणि ओसामा बिन लादेनचा खात्मा करणे हेच अमेरिकेच्या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट हते, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी वारंवार सांगितले आहे. अमेरिकेवर पुन्हा हल्ले होण्याची शक्यता सीआयएचे उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनीही मान्य केली आहे. अफगाणिस्तानमध्ये अल कायदाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.
मात्र, अमेरिकेची दोन दशकांची मोहीम समाप्त झाल्यानंतर अफगाणिस्तान धोकादायक यादीत एकदम तळाला गेला आहे, असे मत “नॅशनल इंटिलिजन्स’चे संचालक अवरिल हायन्स यांनी मांडले आहे. आता धोकादायक देशांच्या यादीमध्ये येमेन, सोमालिया, सीरिया आणि इराक आहेत, असे ते म्हणाले.अल कायदाला अमेरिकेवर पुन्हा हल्ले करण्याची क्षमता येत्या दोन वर्षांत प्राप्त होईल, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी जूनमध्ये म्हटले होते.