सासवड -यशवंत निवारा घरकुल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजनेमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये घोटाळा झाल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी शुक्रवारी (दि.26) पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन केले. आमदार संजय जगताप यांनी सुरेखा ढवळे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पुरंदर तालुक्यामध्ये 2018 19 मध्ये 33 अपंग घरकुल मंजूर झाली होती. त्यापैकी 9 अपंग घरकुल अपात्र केली. यामध्ये सतीश घाटे यांचा ग्रामपंचायतमध्ये निधी वर्ग करण्यात आला होता. परंतु हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग न झाल्याने दप्तर दिरंगाई झाली. नीरा येथील लाभार्थी दिव्यांग नसताना बेघर दाखवून त्याला घरकुल मंजूर करण्यात आले. भोसलेवाडी येथील दोन दिव्यांग व्यक्ती असताना यापूर्वी वडिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. त्यांनादेखील पुन्हा घरकुल मंजूर केले. एकाच कुटुंबात दोन घरकुले मंजूर निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता.
अपंगांसाठी दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता हा सन 2017, 2018 व 2019 या तीन वर्षांमध्ये 15 दिव्यांगांना दोन वेळा लाभ देण्यात आला तर एक दिव्यांग बारामती तालुक्यामध्ये राहत असताना घरकुल बारामतीच्या पंचायत समितीकडून घेतले व उदरनिर्वाह भत्ता हा पुरंदर पंचायत समितीकडून वर्ग केला आहे. या निधीचा अपहार झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ढवळे यांनी आंदोलन केले होते. यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके. पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. यावेळी सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रेय काळे उपस्थित होते.