लक्षणे नसलेल्या रुग्णांचे घरातच विलगीकरण
पिंपरी – केंद्रशासन व राज्यशासनाने सौम्य लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण तसेच उपचार घेण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात देखील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरातच उपचार केले जाणार आहेत. त्याबाबत यंत्रणा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्यस्थितीत शहरात 900हून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत, त्यापैकी 750 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 82 टक्के असल्याने यापुढे सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरातच विलगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देताना हर्डीकर म्हणाले, शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका, तसेच खासगी रुग्णालयात अतिरिक्त बेडची व्यवस्था करत आहोत. यापुढे लक्षणे नसलेल्या करोना बाधितांवर घरातच उपचार सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार केली जात आहे.
शहरात महापालिकेच्या रुग्णालयासह आठ रुग्णालयात 4 हजार बेडची तयारी केली आहे. मात्र, पॉझिटिव्ह असताना लक्षणे नसलेल्यांवर घरात उपचार केले जातील. घरातच आयसोलेशन केल्या जाणाऱ्या रुग्णांची चौकशी करणे, गरज पडल्यास उपचाराची सोय करण्यासाठी यंत्रणा तयार केली जात आहे. त्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
सर्व मदत त्यांना घरी पुरवली जाईल. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, त्यांच्यापासून संक्रमणाचा धोका कमी असतो. त्यामुळे अशा रुग्णांवर घरातील वेगळ्या खोलीत उपचार करणे सोयीचे होईल. त्यांना महापालिका कर्मचारी दोन वेळा फोन करून चौकशी करतील. ज्या रुग्णांना आवश्यकता वाटेल त्यांना तात्काळ डॉक्टरचा सल्ला मिळवून दिला जाईल. घरामध्ये उपचार करण्यासाठी 17 दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला आहे.
सोमवारपासून वायसीएममध्ये टेस्ट सुरू
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वॅब तपासणी लॅब सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून सोमवारपासून याच ठिकाणी करोनाची चाचणी केली जाणार आहे. या लॅबमध्ये 376 टेस्ट केल्या जातील. सध्या शासकीय व खासगी मिळून 650 टेस्ट दररोज होतात. त्या वाढवून एक हजारांपर्यंत टेस्ट करण्याची तयारी आहे, असे आयुक्त हार्डीकर यांनी सांगितले.
कन्टेन्मेंट सोसायटीमध्ये 14 दिवस कडक लॉकडाऊन
ज्या सोसायटी व परिसर सील केले आहोत. त्या भागातून नागरिकांनी बाहेर पडणे अपेक्षित नाही. अनेक सोसायट्यांमध्ये लोक सोसायटीमधील परिसरात वावरत असताना आढळून आले आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.