कोपर्डे हवेली – थकीत व एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय सह्याद्री कारखान्याकडे येणाऱ्या कराड मसूर रस्त्यावर, शहापूर फाटा तसेच उत्तर कोपर्डे ग्रामपंचायत नजीक, शिरवडे रेल्वे स्टेशन, तासवडे टोलनाका सर्व मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत होती.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करत पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी येण्यापासून रोखण्यात यश आले. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील व कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परिश्रम घेतले.
सणासुदीला सामान्य नागरिकांची होलपट…
ऐन सणासुदीच्या वेळी कराड- मसूर या मुख्य मार्गावरील वाहतूक शहापूर शिरवडे मार्गे कराड अशी वळविण्यात आली होती. मात्र, अंतर्गत रस्त्यावर दिशादर्शक फलकाअभावी वाहनधारकांची फसगत झाली नवीन वाहनचालकांना रस्ता माहित नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला.