नगर -चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी आज नगरच्या बाजारपेठेत घोषणाबाजी करण्यात आली. देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांना हीच श्रद्धांजली ठरेल, अशी भूमिका हिंदू मोची समाजसेवा संघ, जिनगर युवा मंच व वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.
चिनी मालावर बहिष्कार टाकल्यास स्थानिक उत्पादनांना बाजारात उठाव मिळेल.
तसेच त्यातून चीनची अर्थिक कोंडीही होईल, असा दावा या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. गलवान खोऱ्यात सीमेवर भारत व चीनच्या सैन्यात सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. त्यांना येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून झालेल्या या निषेध आंदोलनात मर्चंटस् बॅंकेचे उपाध्यक्ष तथा हिंदू मोची समाज सेवा संघाचे पदाधिकारी सुभाष बायड, नरेंद्र गोयल, किरण सोनग्रा, चंदन पवार, मनोहर चव्हाण, रतन पवार, मनोज पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.