T20 World Cup 2024 : पावसानं पाकिस्तानच्या आशेवर फेरलं पाणी…! आयर्लंड विरुद्धचा सामना रद्द झाल्यानं यूएसएची सुपर-8 मध्ये धडक…

T20 World Cup 2024 (USA vs IRE) : आयसीसी पुरुष टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अमेरिका (USA) आणि आयर्लंड यांच्यात फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येणारा 30 वा सामना पावसामुळे वाहून गेला आहे. सामना सुरू होण्यासाठी सुमारे साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली, मात्र खराब आऊटफिल्ड आणि पावसामुळे नाणेफेक न होता सामना रद्द करण्यात आला. अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि यूएसएने पाच गुणांसह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानचा संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
The fate of Group A is 🔒
USA advance to the Super Eight of the #T20WorldCup 2024 as they share a point each with Ireland 👏#USAvIRE pic.twitter.com/NvlDPT0T0Y
— ICC (@ICC) June 14, 2024
यासह अमेरिका संघांनं आपल्या कारकिर्दीच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर आठ फेरीत प्रवेश केला आहे. भारतानंतर अ गटातून पुढच्या फेरीत प्रवेश करणारा अमेरिका हा दुसरा संघ ठरला आहे. पूर्व विजेता पाकिस्तान संघ आणि आयर्लंड हे सुपर आठ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही सातवी वेळ आहे, जेव्हा सहयोगी राष्ट्र सुपर-8 मध्ये पोहोचले आहे. यापूर्वी 2009 मध्ये आयर्लंड, 2014 मध्ये नेदरलँड, 2016 मध्ये अफगाणिस्तान, 2021 मध्ये नामिबिया, 2021 मध्ये स्कॉटलंड आणि 2022 मध्ये नेदरलँड सुपर-8 मध्ये पोहोचले होते.
पावसानं पाकिस्तानच्या आशेवर फेरलं पाणी…
आयर्लंड कोणत्याही किंमतीत यूएसएला पराभूत करेल अशी पाकिस्तान संघ आणि त्याच्या चाहत्यांना आशा होती कारण यूएसएचा पराभव झाला असता तर, पाकिस्तान संघ सुपर-8 च्या शर्यतीत कायम राहिला असता. मात्र हा सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तानने आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला तरी ते पुढच्या टप्प्यात प्रवेश करू शकणार नाही.
T20 World Cup 2024 : पावसामुळे USA vs IRE सामना रद्द झाल्यास पाकिस्तानसह हे ‘3’ संघ होणार बाहेर…
Super 8 : आतापर्यंत हे संघ ठरले पात्र…
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानसह आयर्लंड आणि कॅनडाचे संघही सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. भारत आणि यूएसए पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत 6 संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. आता बांगलादेश आणि इंग्लंड हे उरलेले दोन संघ असू शकतात.





