अर्थकारण: मोटारविक्रीतील मंदी ही घोडचूक सुधारण्याची संधी!

यमाजी मालकर

सर्वाधिक नागरिक अवलंबून असलेल्या शेती आणि रोजगार वाढीसाठी सेवाक्षेत्राच्या विकासाची गरज असताना मोटारींचे उत्पादन आणि त्यांचा खप, याला आपण विकास म्हणू लागलो आहोत, ही घोडचूक आहे. त्या क्षेत्रातील सध्याची मंदी त्यामुळेच, ही घोडचूक दुरुस्त करण्याची संधी आहे.

मोटारींचा खप कमी होतो आहे, यावरून भारतीय उद्योगजगत चिंतित आहेत. मोटार उद्योगात गेले काही वर्षे रोजगार वाढत गेला असून मोटारींचा खप कमी होतो आहे, याचा फटका त्या क्षेत्रातील रोजगारालाही बसणे क्रमप्राप्त आहे. या उद्योगातील रोजगार कमी होतो आहे, हा एवढा एक मुद्दा सोडला तर भारतातील मोटारींचा खप कमी होतो आहे, याचे कोणाला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. आपल्या देशातील केवळ शहरांतच नव्हे तर निमशहरी गावांतही आता मोटारी ठेवण्यास जागा नाही. कितीही रस्ते वाढविले तरी वाहतूक कोंडीतून सुटका होत नाही, अशी सध्या स्थिती आहे. प्रदूषण वाढीत वाढत्या मोटारींचा वाटा मोठा आहे. मोठ्या शहरांत तर वाहन कोठे घेऊन जायचे असेल तर पार्किंगला जागा मिळेल की नाही, याची चिंता करण्याची वेळ आली आहे.

आपल्याकडे मोटार असावी, हा एकेकाळी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आणि ज्यांना मोटारींचा काही उपयोग नाही, त्यांनीही मोटारी घेतल्या. आपण घेतलेली मोटार कोठे ठेवायची, या चिंतेत त्या मोटारीला आपल्या गल्लीत पार्क केली जाते आणि ती जागा कोणी घेऊ नये, यासाठी ती मोटार अनेक दिवस हलवलीही जात नाही, अशी विचित्र परिस्थिती शहरांत पाहायला मिळते आहे. गेल्या काही वर्षांत उभारण्यास आलेले महामार्ग चोवीस तास पळत आहेत. अशा सर्व परिस्थितीत कोणीही जागरूक नागरिक “आता बस्स झाल्या मोटारी’, अशीच प्रतिक्रिया देईल, पण त्यापैकी अनेकांची प्रतिक्रिया आज नेमकी उलटी आहे. मोटारींचा खप वाढला नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेचे काय होईल, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. ही मोठीच विचित्र, विसंगत स्थिती का निर्माण झाली, हे समजून घेतले पाहिजे.

या प्रश्‍नाच्या मुळाशी जायचे असेल तर जगाने निवडलेले औद्योगिक विकासाचे मॉडेल समजून घ्यावे लागेल. गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून जगाने हे मॉडेल निवडले. शेतीवर आधारित विकासात भांडवल निर्मिती गतिमान नव्हती. ती जगाने बॅंकिंगच्या मार्गाने गतिमान केली आणि त्याच्या आधारे औद्योगिक विकास घडवून आणला. ज्यात माणसांऐवजी यंत्रांना कामाला लावण्यात आले. उदा. जे उत्पादन घेण्यास माणसाला एक दिवस लागत होता, ते यंत्राच्या मदतीने काही मिनिटांत होऊ लागले. त्यामुळे अशा कमी वेळेत होणारे उत्पादन खपले पाहिजे, अशी गरज निर्माण झाली आणि ती गरज विकसित राष्ट्रांनी कागदी चलनावर अनेक प्रयोग करून आणि अविकसित देशांत शिरकाव करून भागविलीही, पण आता ही यंत्रे जगभर कामे करू लागल्याने एकमेकांच्या बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा जगभर सुरू झाली.

अमेरिका चीन व्यापारयुद्ध ही त्याचीच एक झलक आहे. ज्याला आपण आज जागतिकीकरण म्हणतो त्याची प्रेरणा अशा बाजारपेठा मिळविणे, हीच राहिली आहे. भारतासारखे जे देश शेतीप्रधान होते, तेही या स्पर्धेत खेचले गेले. कागदी चलनातील पैशाने खरे मूल्य असलेल्या शेतीची पार धूळदाण केली. माणसाच्या पोटाची भूक केवळ शेतीमुळेच भागू शकते, असे असताना तिचे महत्त्व कमी होत गेले. नव्हे शेतीच्या व्यवसायाचे अवमूल्यन झाले. 135 कोटी लोकसंख्या असलेला आणि त्यातील किमान निम्मे म्हणजे 70 कोटी नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असताना मोटारींचा खप कमी झाला म्हणजे मंदी आली, असे म्हणू लागला. याचाच अर्थ असा की औद्योगिक विकासाचे एक मोठे वर्तुळ पूर्ण झाले आहे.

अर्थात, औद्योगिक उत्पादन वाढविण्यास भारताने तुलनेने उशिराच सुरुवात केली असल्याने आणि भारतात त्या उत्पादनासाठी लागणारे भांडवल हे जगाच्या तुलनेत खूपच महाग असल्याने भारताला त्या उत्पादनात जगात अजूनही आपला ठसा निर्माण करता आला नाही. त्यामुळेच आज उत्पादन म्हणून भारत जगात चौथ्या क्रमांकावर असताना भारत मोटारींची निर्यात वाढवू शकला नाही. मोटारींचा देशातच एवढा मोठा ग्राहक असताना जगातील निकषांमध्ये आपण कोठे आहोत, हे पाहण्याची त्याला गरजच पडली नाही. आता जेव्हा देशातील नागरिकही मोटारी विकत घेऊन थकले, तेव्हा या उद्योगाला मंदीची आठवण आली आहे.

सुरुवातीची काही वर्षे जेव्हा देशात परवाना राज होते तेव्हा अतिशय कमी दर्जाच्या मोटारी आणि दुचाकी गाड्यांसाठी भारतीयांना रांगा लावाव्या लागल्या. नंतरच्या काळात जागतिकीकरणात परवाना राज कमी झाले आणि मोटार उद्योगाने आपला विस्तार करून जिकडेतिकडे मोटारीच मोटारी, अशी एक स्थिती निर्माण केली. मोटार उद्योगाच्या अशा अनेक पट वाढीतून पैशांचा जो पाऊस पडला, त्यातील मोठा वाटा अर्थातच परदेशी गुंतवणूकदारांनी काबीज केला. पण दरम्यानच्या गेल्या तीन-चार दशकांत विकास म्हणजे मोटारींचा खप वाढणे, याची जणू आपल्याला सवयच लागली. योगायोगाने त्याच काळात देशातील मध्यमवर्गाचे प्रमाण वाढत गेले आणि मोटारी विकत घेण्याची जणू स्पर्धाच लागली. त्याला अर्थातच त्या त्या वेळच्या सरकारची फूस होती. त्या काळात खरे म्हणजे सार्वजनिक वाहतुकीला प्रचंड प्रोत्साहन देण्याची गरज होती, पण अमेरिकेसारखी ऑटोमोबाइल लॉबी भारतातही तयार झाली असावी, कारण मोटारी खपण्यासाठी सरकारच मदत करताना दिसू लागले.

देशाचा विकास म्हणजे वाहन उद्योगाचा विकास, हे आपल्या देशातील तज्ज्ञ सांगू लागले. त्यांच्यावर राजकीय नेत्यांनी विश्‍वास ठेवला आणि अमेरिकेची विकासाची व्याख्या आपण आहे तशी स्वीकारून टाकली! अमेरिकेत मोटारींचा खप सतत वाढत राहावा यासाठी प्रचंड महामार्ग बांधण्यात आले, एवढा मोठा देश असूनही तेथे रेल्वेचा विकास होऊ दिला गेला नाही. शहरांत सार्वजनिक वाहतुकीच्या खात्रीशीर सेवा उपलब्धच केल्या गेल्या नाहीत. आधुनिक मानवी जीवनाचा विचार करता अनेक निकषांत जगाचा आदर्श मानल्या गेलेल्या या देशांत आजही सार्वजनिक वाहतुकीची अवस्था वाईट आहे! प्रति एक चौरस किलोमीटरला सरासरी (लोकसंख्येची घनता) केवळ 33 नागरिक राहात असलेल्या अमेरिकेत ही विसंगती धकून गेली. मात्र ही घनता तब्बल 425 इतकी प्रचंड असलेल्या भारताला त्याचे अतिशय वाईट परिणाम सध्या भोगावे लागत आहेत. मोटारींचा खप असाच वाढत राहावा, असेच प्रयत्न यापुढे सुरू राहिल्यास भारतावर त्याचे किती विपरीत परिणाम होतील, याची कल्पनाही करवत नाही. मोटार उत्पादकांनी अधिक उत्पादन केले म्हणून त्या क्षेत्रात मंदी आहे, असे म्हणावे लागत आहे, असा सूर बजाज ऑटोचे राजीव बजाज यांनी काढला आहेच आणि ते त्या क्षेत्रातील एक प्रमुख नाव असल्याने त्यांच्या म्हणण्याला महत्त्व आहे.

अर्थात, सध्या ज्या मंदीची चर्चा आहे, ती केवळ मोटार क्षेत्रात नाही. ती कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रात आहे. त्याला मंदी म्हणायचे की आणखी काही, याचाही विचार नव्या बदलांत करावा लागणार आहे. पण केवळ मोटारी पूर्वीसारख्या विकत नाही, याला मंदी म्हटले जात असेल तर आपण त्याला धोरण बदलाची संधी म्हटले पाहिजे. नागरिकांची गरज असो की नसो, त्यांनी मोटारी विकत घ्याव्यात, ही जर आपण अर्थव्यवस्थेची गरज मानू लागलो, तर आपल्याला कोणी माफ करणार नाही. जगातील नवे बदल औद्योगिक उत्पादनाला प्रचंड गती देत आहेत. यंत्रांच्या केवळ बटनावर प्रचंड वस्तू बाजारात येऊन पडत आहेत. चीनसारख्या देशाने राक्षसी उत्पादने सुरू केली आहेत आणि ती भारतात येण्यापासून आपण रोखू शकत नाही. अशा सर्व वस्तू त्याच वेगाने विकल्या गेल्या पाहिजेत, ही आजच्या उरफाट्या अर्थशास्त्राची गरज बनली आहे. सर्वाधिक अवलंबित्व असलेल्या शेतीचा आणि सेवाक्षेत्राचा विकास करणे, ही आपली खरी गरज असून या मंदीतून मार्ग काढताना त्या दिशेने जाण्याचा शहाणपणा धोरणे राबविणाऱ्यांनी आता दाखविला पाहिजे.


भारतातील मोटारींचे उत्पादन आणि खप

सर्व प्रकारच्या वाहनांचा एका महिन्यातील खप: 23 लाख 82 हजार 434
(ऑगस्ट 2018)
सर्व प्रकारच्या वाहनांचा एका महिन्यातील खप: 18 लाख 21 हजार 490
(ऑगस्ट 2019)

वाहन उत्पादनात भारताचा जागतिक क्रमांक: 4
भारताने 2017 मध्ये केलेले प्रवासी कारगाड्यांचे उत्पादन: 40 लाख
मार्च 2019 ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताने निर्यात केलेल्या गाड्या:
6 लाख 73 हजार 630

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)