मुंबई, दि. 18 – विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेक तर्क-विर्तक लावले जात आहे.
दिवाकर रावते हे एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता वर्तवल्या. रावते म्हणाले, लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचे, तसेच विधानसभेला शिवसेनेला 144 म्हणजेच निम्म्या (288 पैकी 144) जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळे जर शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये भरमसाठ इनकमिंग झाले आहे. त्यामुळे भाजपला अधिक जागा हव्या आहेत. तसेच केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे युतीचं काय होणार? हा प्रश्न कळीचा झाला आहे.