पालक, विद्यार्थ्यांचा थेट मनपाच्या सभेत ठिय्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेसाठी सभागृहात घोषणाबाजी प्रशासनाची धांदल

विद्यार्थ्यांना न्याय देणार- आ. जगताप
आयुक्‍तांबरोबर शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. परंतु त्यांनी ठोस निर्णय दिला नाही. आज शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळून देणार असून याबाबत आयुक्‍तांबरोबर चर्चा सुरू असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये तू-तू-मै-मै
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये तू-तू-मै-मै सुरू झाली. कोणाच्या काळात हा निर्णय झाला. शिक्षकांच्या मानधनाचा भिजत पडलेला प्रश्‍न कोणाच्या काळात सुटला नाही. यावरून शिवसेनेच्या माजी महापौर सुरेखा कदम व राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांच्यात चांगली जुगलबंदी झाली. अखेर कोणाच्या काळात काय झाले हे महत्वाचे नाही. आता शाळा सुरू करणे आवश्‍यक असल्याचे सांगून बारस्कर यांनी स्वतःच यावर पडदा टाकला.

नगर – बंद करण्यात आलेली रेल्वे स्टेशन भागातील महापालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांचा सुरू असलेला लढा आज थेट महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत सुरू झाल्याने प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची चांगली धांदल उडाली. पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सभेत घुसून महापौरांच्या व्यासपीठासमोरच ठिय्या मांडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा सुरू करा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. या गोंधळामुळे सभा सुरू होण्यास अर्धातास उशीर झाला. अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कायदेशीर बाबीची प्रशासनाने पुर्तता करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालक व विद्यार्थी सभागृहाबाहेर पडले.

दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिकेच्या रेल्वे स्टेशन येथील शाळेत माध्यमिक विभाग सुरू केला. तत्कालीन सभापतींच्या मान्यतेचे या शाळेत शिक्षक, मुध्याध्यापक, शिपाई ही पदे भरण्यात आली. तिन्ही वर्ग सुरू झाले. रेल्वे स्टेशन परिसरातील मागासवर्गीय, गोर-गरीब विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळाला. मात्र, माध्यमिक विभाग बेकायदेशीर असल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तेथील शिक्षकांनी अनेकवेळा प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर महापालिकेच्या सभेत मंगळवारी थेट पालकांनीच गोंधळ घालून शाळा सुरू करण्याची मागणी केली. पालक, महिला थेट सभेत घुसल्या आणि त्यांनी चक्क ठिय्या दिला.त्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली.

दहावी उत्तीर्ण झालेल्या 16 विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले आणि दहावीची गुणपत्रिका देण्यासही प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे आपले गुण आपल्या डोळ्या पाहण्यास विद्यार्थी मुकले. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासही अडथळे आले आहेत. यामुळेही पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. बेकायदेशीर असलेल्या शाळेच्या शिक्षक, शिपाई यांना आतापर्यंत मानधन दिले जात होते. तेही मानधन प्रशासनाने रोखल्याने त्यांच्यावरही नोकरीची टांगती तलवार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अन्य शाळात समायोजन करा, अशी मागणी पालकांची आहे.

गेल्या आठवड्यात या शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आयुक्‍तांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले होते. परंतु त्यावेळी यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेवर पालक, विद्यार्थ्यांचा मोर्चा नेण्यात आला. सभा दुपारी 1 वाजता सुरू होणार तोच पालक, विद्यार्थी थेट महासभा असलेल्या सभागृहात घुसले. पालक व विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पालकांना अशा पद्धतीने सभागृहात येणे योग्य नाही. आयुक्‍तांच्या दालनात याबाबत आपल्या शिष्टमंडळाने चर्चा करावी. आता सभागृहातून पालक व विद्यार्थ्यांनी बाहेर जावे अशी विंनती महापौरांनी केली. परंतु महिला पालकांनी जोपर्यंत निर्णय होणार नाही तोवर आम्ही बाहेर जाणार नाही. अशी भूमिका घेतली. नगरसेवक अनिल शिंदे यांनी हस्तक्षेप करून आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्या दालनात जाण्याची विंनती केली. त्यानंतर आयुक्‍त दालनात गेले. व त्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा सुरू केली.

दरम्यान सभागृहात पालक व विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी निर्णय झाल्याशिवाय पालक व विद्यार्थी सभागृहाबाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतली. गोर-गरिब विद्यार्थी असून त्यांना ही शाळा शिक्षणासाठी योग्य आहे. माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्य की, या शाळेतील शिक्षकांचा प्रश्‍न देखील रेंगाळला आहे. नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले, सर्वपक्षीय नगरसेवकांची ही शाळा सुरू झाली पाहिजे अशी भूमिका आहे. त्यामुळे महापौरांनी याबाबत निर्णय द्यावा. नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने परस्पर कसा घेतला. तो निर्णय महासभेचा आहे.

पालक व विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी व सभागृहाबाहेर न जाण्याची घेतलेली भूमिका तसेच नगरसेवकांकडून वाढता दबावामुळे अखेर महापौर वाकळे यांनी प्रशासनाला ही शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्या दरम्यान, आयुक्‍तांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाल्याने शिष्टमंडळाने देखील सभागृहात येवून निर्णय सकारात्मक असल्याचे जाहीर केल्यानंतर पालक व विद्यार्थी सभागृहातून बाहेर गेले.

सेना स्टाईलने उत्तर- राठोड

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी आज शाळेची पाहणी करून परिसरातील पालकांबरोबर चर्चा केली. शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होवू देणार नाही. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा राठोड यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.