कोल्हापूर- नवी मुंबई, पुणे, सातारा, उस्मानाबाद सह कोल्हापूर परिक्षेत्रात वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाच्या 25 गुन्ह्यात आणि ट्रिपल मोक्काअंतर्गत कारवाईत पाहिजे असलेला कुख्यात आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने व त्याचा साथीदार पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर यांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे म्हणाले, आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने याच्याविरुद्ध 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये दरोडा, रॉबरी, खंडणी सारखे गुन्ह्यांचा समावेश आहे. मानेवरती खारघर नवी मुंबई, कोडोली- कोल्हापूर, राजगड- पुणे ग्रामीण या ठिकाणी तीन गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसंच सोन्याचे दुकान लुटताना फलटणमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकावर ती पकडण्यास गेली असता त्यांच्यावर बंदुकीने फायरिंग केली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
तसंच आप्पा उर्फ सुभाष माने व पप्पू उर्फ सुहास सोनवलकर या आरोपीने त्यांच्या आणखीन साथीदारांसह पोलिस वेशांतर करून राजगड पोलिस ठाणे हद्दीमध्ये बालाजी ज्वेलर्स च्या दुकानात दूर टाकून फायरिंग केले होते. असे अनेक गंभीर गुन्हे यांच्यावर नोंद आहेत.या दोघांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 2 पिस्टल, एकूण जिवंत 20 राउंड, तीन मॅगझीन हस्तगत केलं असून गाडी सह मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजार 745 मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बळकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने केली.