कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रक आणि टेम्पो चोरीला गेल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून सहा जणांना अटक केली आहे. या ट्रक टेम्पो चोरीची आंतरराज्य टोळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गुन्हे उघडकीस आणून ट्रक टेम्पो सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी आज दिली आहे
पो.नि. प्रमोद जाधव म्हणाले, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे व गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत 22 ऑगस्ट रोजी ट्रक आणि टेम्पो चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने दोन्ही पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक करत होते.
गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अमनदीप उर्फ जय प्रीत उजागर सिंग (राहणार पनवेल कळंबोली जिल्हा रायगड), सानेअली जमालउद्दिन खान (राहणार गोपाळपुर राणीगंज प्रतापगड उत्तर प्रदेश) , दिलीप यादव घोडके (राहणार शिरसाठवाडी पाथर्डी जि अहमदनगर), अनिल कुमार बबलू यादव (राहणार ग्रमाखरकाखास ता. ठाणागिरी जि-प्रयागराज उत्तर प्रदेश ) , आनंद कुमार देवनाथ पटेल (ग्रामर जयपुर ता आरोही जि बंधोही उत्तर प्रदेश), करीम रफिक मोहम्मददिन शेख (राहणार तुमकुर कर्नाटक) या 6 जनांनाच्या आंतरराज्य टोळीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शिरोली एमआयडीसी व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले आयशर ट्रक अशोक लेलँड टेम्पो व गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार यांसह मोबाईल असा पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यातील जयप्रीत उजागर सिंग व दिलीप यादव घोडके यांच्या विरुद्ध मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नाशिक अहमदनगर या जिल्ह्यात तसेच पंजाब राज्यांमध्ये चार चाकी वाहन चोरीचे प्रत्येकी 30 ते 35 गुन्हे नोंद आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केली आहे.