नवी दिल्ली – कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आता फक्त 900 रुपयांना मिळणार आहे. देशात करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा मागणी वाढल्यावर रेमडेसिवीरची किंमत 2800 रुपये झाली होती. काळ्या बाजारानेही त्याच पाच ते पंधरा हजारपर्यंत विक्री झाल्याच्या बातम्या होत्या.
रेमडेसिवीर बनवणाऱ्या झायडस कॅडिला या कंपनीने औषधाची किंमत 70 टक्क्यांनी कमी केली आहे. हेच इंजेक्शन मायलन या बंगळूरु येथील कंपीनीकडून सरकारला 600 रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला होता. याच काळात लोकांनी मूळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी केले होते. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत कमी करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
एकीकडे करोनाच्या औषधांमध्ये मोठी नफेखोरी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असतांना या निर्णयामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचणार आहेत. तसेच करोनाविरुद्धची लढाई आणखी सक्षमपणे लढता येईल असे मानले जाते आहे.
करोनाबाधितांमध्ये नव्याने होणारी वाढ ही आता चिंता वाढवत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार एकट्या मुंबईत 24 तासांमध्ये तब्बल 5185 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.