पुणे -जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये 15 ते 17 वयोगटातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यांत अपेक्षित लाभार्थ्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटातील अपेक्षीत लाभार्थी संख्या 2 लाख 11 हजार 975 आहे. त्यातील 1 लाख 82 हजार 232 जणांनी लसीचा डोस घेतला आहे.
देशात करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. टप्याटप्याने सुरू असलेल्या लसीकरणामध्ये नुकतेच 15 ते 17 वयोगटातील मुलांना लसीकरणाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार राज्यात लसीकरणाची गती वाढविण्यात आली.
पुणे जिल्ह्यात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील तालुक्यांमध्ये लसीकरण सर्वाधिक असून, 13 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये अपेक्षित लाभार्थ्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. त्यामध्ये वेल्हा, भोर, आंबेगाव, मावळ, दौंड, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्यांचा समावेश आहे.
तर हवेली तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाल्याचे दिसून येते. हवेलीमध्ये 56 हजार 997 लाभार्थ्यांपैकी 27 हजार 468 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुळशीमध्ये 11 हजार 573 लाभार्थ्यांपैकी 7 हजार 139 जणांनी लस घेतली.
तालुका, झालेले लसीकरण, कंसात अपेक्षीत लाभार्थी
वेल्हा – 2054 (1858), मुळशी – 7139 (11573), भोर – 7448 (6370), पुरंदर – 8184 (9268),आंबेगाव – 9674 (9568), मावळ – 13435 (12571), जुन्नर – 14395 (16492), दौंड – 15544 (15051), इंदापूर – 17214 (16559), शिरूर – 18959 (19483), बारामती – 19247 (18281), खेड – 21471 (17904), हवेली – 27468 (56997).