रेडा – आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा 2019 -20 मधील 40 टक्के विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचे अनुदान मिळावे, या मागणीसाठी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भीमाई आश्रमशाळेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
हा मोर्चा भीमाई आश्रमशाळेतून नेहरू चौक ते पांधारा मार्गे, बाबा चौक, इंदापूर पोलीस ठाण्यासमोरून तहसीलकडे नेण्यात आला. यावेळी मोर्चात सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून, मास्क, सॅनिटायझरचा वापर केला. फलक घेऊन मोर्चा शांततेत काढण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आश्रमशाळेच्या विश्वस्त शकुंतला मखरे, समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार उपस्थित होते.
मखरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे परिपोषण आहार अनुदान मार्च 2020 पर्यंत मिळणे अपेक्षित असताना ते अद्याप मिळाले नाही. कनिष्ठ महाविद्यालयात अपुरे कर्मचारी व प्राध्यापक आहेत. त्यांची भरती करणे गरजेचे आहे. दि. 15 ऑगस्टपर्यंत मागण्या सोडवा; अन्यथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावी एकटे उपोषण करणार आहे. (दि.19) बारामती प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.