1700 रुग्णांवर घरी उपचार सुरू ः प्रशासन घेतेय काळजी
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडची संख्याही अपुरी पडत आहे. ज्या रुग्णांच्या घरी सोय आहे त्यांना होम आयसोलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. आतापर्यंत 27 हजार रुग्णांपैकी नऊ हजाराहून अधिक रुग्णांनी घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय निवडला. त्यापैकी आतापर्यंत साडेसात हजार रुग्ण घरच्या घरी ठणठणीत बरे झाले आहेत. तर सुमारे सतराशे रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत. सर्वांत आनंदाची बाब अशी अपवादात्मक एखादी घटना सोडल्यास घरी उपचार घेत असलेल्या कोणत्याही रुग्णाची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्याची वेळ आली नाही.
शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड अपुरे आहेत. त्यामुळे आवश्यकता असलेल्या रुग्णांना बेडची व्यवस्था मिळत नाही. त्यासाठी महापालिकेने ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांवर घऱीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. शहरातील रुग्णसंख्या 27 हजारांच्या पुढे गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोविड केअर सेंटरमध्ये पाच हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 546 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
करोनाबाधित बहुतांश रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत, मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण रुग्णांच्या सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. अशाप्रकारे लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेट होण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यामध्ये अनेकांना स्वंतत्र खोलीची अडचण होती. मात्र ज्यांची सोय आहे त्यांच्याकडून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला काय लक्षणे आहेत. त्याच्यावर घऱी उपचार केले तर चालतील का याची खातरजमा डॉक्टर करतात. तसेच रुग्णाच्या घरी स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आहे का याची चौकशी केली जाते. तसेच त्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती असेल तरच रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिली जाते. ज्या रुग्णांची सोय नाही अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रुग्णांना मात्र होम आयसोलेट केले जात नाही.
शहरामध्ये आतापर्यंत 27 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत तब्बल 9 हजार रुग्ण होम आयसोलेट होते. त्यातील 10 दिवस पूर्ण झालेले 3,170 पॅसिव्ह होम आयसोलेशन आहेत. होम आयसोलेशन पूर्ण झालेले 4,385 रुग्ण आहेत. तर 7,555 रुग्णांचे होम आयसोलेशन पूर्ण झाले असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर सद्यस्थितीत शहरात 1700 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. होम आयसोलेट केलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेतली जाते. ती संगणकामध्ये ठेवली जाते. होम आयसोलेट असलेल्या रुग्णाच्या इमारतीमध्ये कोविड रुग्ण असल्याचा फलकही लावला जातो.
फोनद्वारे केली जाते चौकशी
महापालिकेच्या वतीने होम आयसोलेट झालेल्या रुग्णांची पूर्ण काळजी घेतली जाते. पहिले दहा दिवस रुग्णाला वॉररुममधून दररोज फोन करून चौकशी केली जाते. त्यांच्या प्रकृतीची माहिती दररोज नोंदवून घेतली जाते. रुग्णाला त्रास होत असल्यास रुग्णवाहिका पाठवून त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र अद्याप अपवादात्मक एखादी घटना सोडली तर अशी वेळ आली नाही. त्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. दहा दिवसांनी जर काही त्रास होत असेल तर रुग्णांने महापालिकेला कळविणे आवश्यक आहे.