पुणे – केरळमध्ये आगमननंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे थबकलेल्या मान्सुन अर्थात नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी अखेर महाराष्ट्रात आगेकूच केली. याबाबत भारतीय हवामन विभाभागाने आनंदवार्ता दिली आहे. शनिवारी मान्सूनने भारताचा बहुतांश भाग व्यापला. यात कोकण किनारपटी, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक ते मध्यम पाऊस झाला. तर, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.
यात प्रामुख्याने मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, महाराष्ट्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंड आणि हिमाचलच्या बहुतांश भागात मान्सून पुढे सरकला आहे. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून पुण्यातील पावसाची स्थिती मान्सूनसाठी पूरक आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात पाऊस जोर धरणार
राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागांत सक्रिय असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार. पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यातही पावसाचा जोर राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे.