प्रभात प्रभाव : तीन बॅंकांच्या एटीएममध्ये रक्कम जमा
भवानीनगर – येथील बाजारपेठेत असलेल्या तीनही बॅंकांचे एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने खातेदारांची कायम गैरसोय होत होती. याबाबत दैनिक प्रभातने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तीन बॅंकांच्या एटीएममध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे भवानीनगर परिसरातील खातेदारांना दिलासा मिळाला आहे.
भवानीनगर येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे तीन बॅंकांनी एटीएम सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे. मात्र, गेल्या महिन्यात एटीएममध्ये खडखडाट असल्याने खातेदार वैगातले होते. त्यातच साप्ताहीक सुट्टी, उत्सव असल्यामुळे रक्कम मिळत नव्हती. याबाबत प्रभातने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बॅंक प्रशासनाने याची दखल घेत रक्कम उपलब्ध केली. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून खडखडाट झालेले एटीएम पुन्हा सुरू झाले आहे.
भवानीनगर येथे युनियन बॅंक, महाराष्ट्र बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या तीनही एटीएम सेवा आहेत. तसेच भवानीनगर परिसरात बाजारपेठेत उलाढाल मोठी असल्यामुळे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.