हिंजवडी – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या धर्तीवर आयटीनगरी असलेल्या हिंजवडीमध्ये मोहल्ला क्लिनिक ही आरोग्यदायी मोहीम आज गुरुवारी (दि. 5) पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मुळशीचे गटविकास अधिकारी तथा तालुक्याचे प्रशासक संदीप जठार यांनी दिली.
हिंजवडी ग्रामपंचायतीच्या आवारात आयटीनगरी हिंजवडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन जांभुळकर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ सकाळी 8 वाजता माध्यमिक विद्यालयाच्या शेजारील सभागृहात होणार आहे. आरोग्यदायी गाव या मोहिमेंतर्गत मुळशीत पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या मोहल्ला क्लिनिकमध्ये दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी बालरोगतज्ज्ञ तर दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच जनरल मेडिसीन (औषधोपचार) तज्ज्ञांच्या भेटी होणार आहेत.
गोरगरिबांना असणाऱ्या विविध आजारांवर उपचारासाठी एमडी डॉक्टरांचा सल्ला व तपासणीकरिता आर्थिक चणचण भासत असल्याने अनेकांचे दुर्धर आजार बळवतात परिणामी मोठमोठ्या शस्रक्रिया करण्याची नामुष्की येते. या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील गरीब गरजू कुटुंबातील मुले, शालेय विद्यार्थी, महिला यांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार असल्याचे जठार यांनी सांगितले. मोहल्ला क्लिनिकचा हा आरोग्यदायी उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या सर्वांची बैठक घेऊन प्रत्येकावर जबाबदारी सोपवली आहे. याकामी हिंजवडी ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांपूर्वी हिंजवडी, माण, पिरंगुट आशा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या शिष्टमंडळाने दिल्ली व इंदोर शहराचा अभ्यास दौरा केला होता. तेथील प्रकल्प व आरोग्यविषयक उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करीत आहोत.
– संदीप जठार, गटविकास अधिकारी, मुळशी.