वंदना बर्वे
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या बैठकीचे लाईव्ह प्रसारण केल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली. करोनाच्या प्रसारामुळे गंभीर झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली होती. चर्चा सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चेचे लाईव्ह प्रसारण करायला सुरुवात केली. हे टीव्हीवर प्रसारित झाले. पंतप्रधान मोदी यांनी यावर आक्षेप घेतला.
मोदी म्हणाले की, ‘सरकारची परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात एक मुख्यमंत्री बैठकीचे लाईव्ह प्रसारण करीत आहे’. यावर केजरीवाल यांनी क्षमा मागत पुन्हा अशी चूक होणार नसल्याची ग्वाही दिली.
अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीत दिल्लीतील ऑक्सिजनच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. करोनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय पॉलिसी बनविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एवढ्यातच मोदी यांनी त्यांना थांबविले. यावर आक्षेप घेत मोदी म्हणाले की, ‘ सरकारची परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात एक मुख्यमंत्री बैठकीचे लाईव्ह प्रसारण करीत आहे. हे योग्य नाही आणि सर्वांनी संयम बाळगला पाहिजे’. यानंतर केजरीवाल यांनी दिलगिरी व्यक्त केली.
केजरीवाल म्हणाले की, ‘माझे काही चुकले असेल तर त्यासाठी मी माफी मागतो’. यापुढे काळजी घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, केजरीवाल यांनी थोड्या वेळानंतर एक वक्तव्य जारी केले. बैठकीचा कोणताही भाग प्रसारित केला जाऊ शकणार नाही, अशाप्रकारची कोणतीही सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आली नव्हती. यापूर्वी अशाप्रकारच्या बैठकीचे प्रसारण होत आले आहे. म्हणून आपण प्रसारण केले असे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.