नवी दिल्ली – संसदेच्या कॅन्टीनमध्ये भोजन घेत असतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे शुक्रवारी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. संसदेच्या कॅन्टीनमधील भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी मोदी तिथे गेले नव्हते; तर आपल्या पक्षाच्या काही सदस्यांसमवेत भोजनाची त्यांची इच्छा झाली होती. विशेष म्हणजे यात भाजपशिवाय अन्य राजकीय पक्षांचे खासदारही सहभागी झाले होते. बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एनके प्रेमचंद्रन, तेलगू देसम पक्षाचे राम मोहन नायडू, बहुजन समाज पक्षाचे रितेश पांडे आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, हीना गावित यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत भोजन घेतले.
पंतप्रधानांनी नंतर एक्सवरील एका पोस्टमध्ये सांगितले की त्यांनी दुपारी भरभरून जेवणाचा आनंद घेतला. विविध पक्षांच्या आणि भारताच्या विविध भागांतील संसदीय सहकाऱ्यांनी ते अधिक संस्मरणीय झाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन शनिवारी संपले. आता एप्रिल-मेमध्ये अपेक्षित लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे पंतप्रधान एका वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसून आले.
दुपारच्या जेवणानंतर केंद्रीय मंत्री मुरुगन यांनी सांगितले की सर्वांना आश्चर्य आणि आनंद झाला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिनचर्येबद्दल सांगितले. त्यांनी आपली योगसाधना, परदेश प्रवास, कराची टूर याबद्दल सांगितले. आम्हाला त्यांच्यासोबत ४५ मिनिटे मिळाली. त्यांच्याकडून अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. मोदी म्हणाले की, ते फक्त ३.५ तास झोपतात आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर काहीही खात नाहीत. पंतप्रधान मोदी सामान्य माणसाप्रमाणे आमच्यासोबत बसले. त्यांनी सर्वांच्या भोजनाचे बिलही भरले. हा एक कधीही न विसरता येणारा क्षण होता.
भाजप खासदार हीना गावित म्हणाल्या की, जेव्हा मला कळले की पंतप्रधान मोदी मला शोधत आहेत, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. मी तिथे पोहले तेव्हा विविध पक्षांचे अनेक खासदार आधीच उपस्थित होते. आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले. कॅन्टीनमध्ये जेवण करत असलेल्या मोदींना पाहून सगळेच थक्क झाले. तो एक आश्चर्यकारक आणि विशेष क्षण होता. तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव होता.