मोदीजी, ‘यांना’ आवरा! देशातील डॉक्टर्सनी केली पंतप्रधानांकडे राजकीय नेत्यांची तक्रार

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्र, गुजरात दिल्ली पाठोपाठ इतर राज्यांतही धुमाकूळ घातले आहे. त्यामुळे करोना योद्धे देशात काम करत असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा मोठा ताण पडला आहे. अशा संकट काळात राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना व्हीआयपी कल्चरचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात डॉक्टरांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केली आहे.

फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात डॉक्टरांनी राजकीय नेत्यांच्या व्हीआयपी कल्चरची तक्रार केली आहे. राजकीय नेत्यांकडून व्हीआयपी कल्चरचे दर्शन घडत असून, शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना राजकारण्यांकडून चाचण्या आणि उपचारासाठी थेट घरी बोलावून घेतले जात आहे, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

करोना काळात पहिल्या फळीत सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना विषाणूचा संसर्ग झाला, तर अल्पशी सुविधा मिळते. तर दुसरीकडे रॅली आयोजित करणाऱ्या आणि विषाणूचा प्रसार करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वरचा प्राधान्यक्रम दिला जातो. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्हीआयपी काऊंटर्स आहेत. तिथे फक्त राजकीय नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्याच कोविड चाचण्या केल्या जातात. पण, अशा ठिकाणी डॉक्टरांसाठी स्वतंत्र काऊंटर्स नाहीत, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षकांसाठी कोणतेही आदेश नसताना राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना चाचण्या आणि उपचारासाठी त्यांच्या घरी बोलावले जाते. या महामारीच्या काळात डॉक्टरर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र त्या मोबदल्यात त्यांना काय मिळत आहे, तर चाचण्यांसाठी लांब रांगामध्ये उभं राहावं लागतंय. करोना झाल्यानंतर त्यांना बेड आणि आयसीयूही उपलब्ध होत नाही. अशी तक्रार फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने केली असून, या पत्रावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेश बागडी, उपाध्यक्ष डॉ. अमरनाथ यादव आणि महासचिव डॉ. सुब्रांकर दत्ता यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.