प्रेरणादायी : अभियांत्रिकी सेवा परीक्षेत चारुदत्त साळुंखे देशात पहिला

चाफळच्या युवकाचे युपीएससी परीक्षेत यश

कराड – स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्‍निकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या 2020 च्या परीक्षेतून देशातून पहिला क्रमांक (युपीएससीमध्ये देशात 48 वा) मिळवत सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील चारुदत्त साळुंखे याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच देशाच्या टेक्‍निकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे संशोधक म्हणून त्यांची निवड झाली होती.

दरम्यानच्या काळात भाभा रिसर्च सेंटरची मुलाखत आणि मेन्स परीक्षेच्या अवघ्या एक महिना आधी चारुदत्तचे वडील कोरोनाशी झुंज देऊन घरी परतले होते. अशा कठीण प्रसंगातही संयम न गमावता कुटुंबीयांची काळजी घेत त्यांनी मेन्सची आणि मुलाखतीची तयारी पूर्ण केली होती. त्याच्या या प्रेरणादायी यशाबद्‌द्‌ल आता त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा-2020 परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच झाला. या परीक्षेतील यांत्रिकी अभियंता विभागात कराडचा चारुदत्त मोहनराव साळुंखे हा देशात पहिला आला आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कराडचा झेंडा फडकला आहे. चारुदत्तचे वडील मोहनराव साळुंखे खासगी संस्थेत क्‍लार्क म्हणून काम करतात तर आई संगीता साळुंखे या शिवाजी हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षिका आहेत.

मूळचा पाटण तालुक्‍यातील चाफळसारख्या ग्रामीण भागाचा रहिवासी असणाऱ्या चारुदत्त साळुंखे यांचे प्राथमिक शिक्षण कराडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिर येथे झाले. पुढे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल, कराड येथून घेत त्याने दहावीला 94.55 टक्के गुण मिळवले. दहावीनंतर एसजीएम कॉलेज, कराड येथून 92.33 टक्‍क्‍यांसह सह विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. बारावी विज्ञान शाखेतूनच एमएचटी-सीईटी परीक्षेत 184 गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या ऍटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यांमधून नोकरीच्या संधी हातात असताना देखील शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे ध्येय चारुदत्त यांनी बाळगले होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी काय करू शकतो हे चारुदत्त यांनी दाखवून दिले आहे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे होय. त्याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. शासकीय सेवांचा म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्‍निकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या परीक्षेतून यश मिळवत चारुदत्त साळुखे यानं नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी त्याची निवड झाली.

तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्‍नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अणुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे तावून सुलाखून संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.