मोदी-शहा यांच्याकडून द्वेषाचे राजकारण- कॉंग्रेस

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्यामुळे कॉंग्रेसने आज केंद्र सरकारवर राजकीय सुडाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे.

कॉंग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज सायंकाळी पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लोकशाहीची हत्या करण्याचा आरोप केला.

सरकारने कॉंग्रेस नेत्या सोनिया गाधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीच्या प्रभारी महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांची आज एसपीजी सुरक्षा काढून घेतली. यामुळे पित्त खवळलेल्या कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

गांधी कुटुंबातील सदस्यांना अल कायदा या दहशतवादी संघटनेपासून आणि नक्षलवाद्यांपासून जीवाचा धोका आहे, असे एसपीजीने चार वेळा पत्र लिहून सरकारला पंधरा दिवसांपूर्वी कळविले होते. राहुल गांधी वायनाडच्या दौऱ्यावर असतानाही त्यांना जीवाला धोका असल्याचे कारण सांगून एसपीजीच्या जवानांनी लोकांपासून अंतर राखण्यास सांगितले होते.

अशात, केंद्र सरकारने अचानक सुरक्षा काढून घेतली. मुळात, केंद्र सरकार राजकीय वैमनस्येतून सुडाचे राजकारण करीत आहे. यापूर्वी व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने सुध्दा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची सुरक्षा काढून घेतली होती. ही सुरक्षा कायम असती तर राजीव गांधी आज जीवंत असते.

तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या सुध्दा एसपीजी सुरक्षेच्या अभावामुळे झाली होती. सरकारच्या द्वेषापोटी दोन-दोन पंतप्रधानांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता केंद्र सरकार सुध्दा पुन्हा तीच चूक करीत आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.