टेरर फंडिंगला आळा घालण्यात कुचराई
इस्लामाबाद -दहशतवादासाठी पुरवला जाणारा निधी (टेरर फंडिंग) रोखण्यात पाकिस्तान कुचराई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काळातही त्या देशावर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्येच राहण्याची नामुष्की ओढवणार आहे.
टेरर फंडिंग आणि मनी लॉण्डरिंगला आळा घालण्याच्या उद्देशाने एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय यंत्रणा कार्यान्वित आहे. त्या यंत्रणेच्या रडारवर पाकिस्तान आहे. एफएटीएफने मागील वर्षी जूनमध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले. त्यानंतर पाकिस्तानला विशिष्ट पाऊले उचलण्यासाठी यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीपर्यंत पाकिस्तान समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.
त्यामुळे त्या देशाला पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पाकिस्तानविषयीचा अनुभव पाहता त्या देशाला पुढील काळातही ग्रे लिस्टमध्येच ठेवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एफएटीएफने आणखी कारवाईचा इशारा देताना पाकिस्तानला थेट काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचे सूतोवाच याआधीच केले आहे. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये असणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळवणे अवघड जाते. काळ्या यादीत गेल्यानंतर तर संबंधित देशावर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातात.