जामनगर – गुजरातमधील जामनगरमध्ये उभारण्यात आलेल्या आयुर्वेदिक शिक्षण व संशोधन संस्थेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
सध्या अस्त्विात असलेल्या चार आयुर्वेद संस्थांचे एकत्रीकरण करून ही नवी संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेला स्वत:चे अभ्यासक्रम ठरवण्याचे व प्रत्यक्षात लागू करण्याचे अधिकार असणार आहेत. ही एक स्वायत्त संस्था असणार आहे. विद्यापीठाचा दर्जा असलेली अशा प्रकारची देशातील ही पहिलीच संस्था असणार आहे.
गुजरातेत सन 1967 साली राज्य विधानसभेने एक स्वतंत्र प्रस्ताव मंजूर करून राज्यात आयुर्वेदिक विद्यापीठ स्थापन केले होते. त्याच विद्यापीठात आता अन्य संस्थांचे विलीनीकरण करून हे एक राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्याला गुजरात सरकारचे आर्थिक पाठबळ लाभणार आहे.