जुन्नरमध्ये बिबट्यांवर होणार आधुनिक उपचार

माणिकडोहच्या निवारा केंद्रात देशातील पहिले स्वतंत्र रुग्णालय
जुन्नर  – जुन्नर विभागात बिबट्यांच्या समस्येवर विविध उपाययोजना होत आहेत. त्याचवेळी विविध घटनांमध्ये जखमी झालेले बिबटे, निवारा केंद्रात ठेवण्यात आलेले बिबटे यांची नियमित आरोग्यदेखभाल तसेच उपचारासाठी देशातील पहिले भव्य, आधुनिक असे सुमारे वीस हजार चौरस फुटांचे रुग्णालय जुन्नरपासून 7 कि. मी. अंतरावर असलेल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये साकारले जात आहे. राज्यशासनाकडून मिळालेल्या 2 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून त्याची उभारणी सुरू असून 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मार्चपासून ते पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

बिबट्यांवरील शस्त्रक्रियेपासून विविध प्रकारचे उपचार करण्याची सुविधा असणार आहे, बिबट्यांच्या जनुकीय तपशीलाचे पृथक्करण करणारी पीसीआर यंत्रणा देखील येथे बनविण्यात येत आहे. भारतीय वन्यप्राणी प्राधिकरणाकडून रुग्णालय उभारणीचे तांत्रिक अवलोकन केले जात असून, रुग्णालयाचे नियमन महाराष्ट्र वन्यप्राणी प्राधिकरणाकडून होणार आहे.

बिबट्यांवर होणारे आधुनिक उपचार
जखमी अवस्थेतील अन्य वन्यजीवांच्या उपचारासाठी देखील हे रुग्णालय संजीवनी ठरणार आहे. विविध घटनांत जखमी झालेले बिबटे, पाय किंवा शरीराला फ्रॅक्‍चर झाल्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर देखील येथे आहे. अगदीच स्नायू दुखावलेले, पक्षघात झालेले बिबटे यांच्यावर लेझर उपचार करण्यासाठी लेझर मशीन, मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांत जेरबंद केलेले बिबटे अनेकदा पिंजऱ्याच्या लोखंडी सळया तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांच्या दात किंवा हिरड्यांना इजा होते. त्यामुळे अशा दातांचे आजार झालेल्या बिबट्यांवर उपचार करण्यासाठी डेंटल कीट देखील उपलब्ध करण्यात येत आहे. याबरोबरच रक्ताची तपासणी करण्यासाठी ब्लड ऍनालायझर, पक्षघात झालेल्या बिबट्यांवरील उपचारासाठी एक्‍युपंक्‍चर मशीन, बॅटरीवर चालणारे आणि कुठेही जखमी किंवा जायबंदी झालेल्या प्राण्यांच्या हाडांचे फोटो काढण्यासाठीचे पोर्टेबल एक्‍स-रे मशीन, सूक्ष्मदर्शक, सोनोग्राफी मशीन, भूल देण्यासाठीचे मशीन अशा विविध आधुनिक उपचार आणि निदानाची सामग्री देखील उपलब्ध करण्यात येत आहे.

हे रुग्णालय चालविण्यासाठी वाईल्डलाईफ एसओएस या संस्थेकडून वैद्यकीय अधिकारी, तसेच सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह, आवश्‍यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती असणार आहे. वनविभागाचे कर्मचारी देखील त्यांना सहाय्य करणार आहेत. सध्या वाईल्डलाईफ एसओएस संस्थेचे एक मुख्य वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक, तर 8 कर्मचाऱ्यांची उपलब्धता असेल. वनविभागाचे चार कर्मचारी यासाठी कार्यरत असतील. तांत्रिक प्रयोगशाळा, सहाय्यक तसेच प्राणितज्ज्ञाच्या जागा देखील यासाठी भरण्यात येणार आहेत.
-जयरामे गौडा, उपवनसंरक्षक,जुन्नर, वनविभाग जुन्नर

बिबट्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला किंवा एखादे जनावर मारले तर तेथील रक्ताचे नमुने आणि नंतर जेरबंद केलेल्या बिबट्याचे नमुने यांचे डीएनए पृथक्करण, इथल्या इथे करता येईल, त्यामुळे हल्ला करणाऱ्या बिबट्याचा यथोचित शोध घेणे शक्‍य होईल.
– डॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, बिबट्या निवारा केंद्र, माणिकडोह

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.