पुणे – काय केले म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळतो, या प्रश्नाचे उत्तर जसे कोणाकडेच नसते तसेच भारतीय संघातून संजू सॅमसनला सातत्याने वगळून ऋषभ पंतला वारंवार का संधी देण्यात येते याही प्रश्नाचे उत्तर सध्या कोणाकडेही नाही. कितीही अपयशी ठरला तरीही कोणाच्या तरी वरदहस्तामुळेच पंतला वारंवार संधी देण्यात येते का, अशी विचारणा केल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने मात्र दैनिक प्रभातशी दूरध्वनीवरून बोलताना केवळ नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.
रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यातून संजू सॅमसनला वगळण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सॅमसनने सातत्याने धावा केल्या आहेत. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्याने सातत्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे, मात्र वारंवार अपयशी ठरूनही पंतलाच संधी देण्यात येते. सॅमसनला मात्र एखाद्या सामन्यानंतर पुन्हा गाशा गुंडाळावा लागत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील संघ निवडीमध्येही हेच चित्र दिसले. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी सेकंड बेंचला रोटेशननुसार खेळविण्यात येणार असल्याचे संकेत एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिले होते. त्यानुसार दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या मालिकांमध्ये काही खेळाडूंना खेळविण्यात आले, मात्र हाच न्याय सॅमसनसाठी का लावला गेला नाही, आणखी किती काळ पंतला संधी देणार अशीही विचारणा आता सोशल मीडियावर चाहते करत आहेत.
माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा वारसदार शोधण्याची सध्या मोहीम सुरू आहे, मात्र, त्यात केवळ पंतलाच झुकते माप दिले जात आहे. इशान किशन, सॅमसन तसेच युवा संघातील आणि सेकंड बेंचमधील काही खेळाडूंना खेळविण्यात येणार असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले होते मात्र प्रत्येक संघनिवडीनंतर पंतचीच निवड केली जाते, यामागे काय आहे. कोणाचा वरदहस्त आहे. द वॉल राहुल द्रविडचा हा शिष्य सातत्याने उपेक्षित का राहतो, असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संधी दिली होती. त्यात त्याने 2 चेंडू खेळले होते, त्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यावर पुढील चेंडूवर तो बाद झाला होता. मात्र तरी देखील त्याला संधी का नाकारली गेली. केवळ एकाच सामन्यातील अपयशाचे मोजमाप लावले तर मग पंत संघात कसा टिकला हा प्रश्न कायम राहतो.
कोटा पद्धत बंद होणार का ?
भारतीय संघाची निवड कोटा पद्धतीनुसार होते. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य अशा पाच विभागातून निवड समितीवर निवडून आलेले सदस्य संघाची निवड करतात. हा असला द्राविडी प्राणायाम केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळातच आहे. संघ व देशहित लक्षात घेत आणि आपल्याच विभागातील खेळाडूंसाठी फिल्डिंग लावली जाते हे देखील उघड आहे. मग अन्य विभागातील सरस खेळाडूंना डावलले जाते. ही वर्षानुवर्षे सुरू असलेली अत्यंत वादग्रस्त पद्धत केव्हा बंद होणार हा प्रश्न आता महत्त्वाचा बनला आहे.