नगर (प्रतिनिधी) – अंगणवाडी उघडत नाही… स्तनदा माताची नोंदणी होत नाही…अंगणवाडी केव्हाही बंद केली जाते, या सारख्या अनेक तक्रारी अंगणवाडीबाबत केल्या जात होत्या. या सर्व तक्रारींना आता लगाम लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या कॉमन ऍप्लिकेशन सॉप्टवेअर (कॅश) प्रणाली सुरु झालेली आहे. यावर सगळ्याच नोंदणी ऑनलाइन केल्या जात आहेत
अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी उघडल्यापासून ती बंद होईपर्यंत दैनंदिन केलेली कामे त्यांना रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत होती. यामध्ये बालकांची उपस्थिती, गृहभेटी, स्तनदा व गर्भवती मातांची आदी दहा प्रकारची माहितीची नोंद त्यांना कायमच ठेवावी लागत होती. ही नोंदणी करताना त्यांना कायमच बरोबरच रजिस्टर बाळगावे लागत होते. तसेच या रजिस्टरची जपनूक त्यांना करावी लागत होती. मात्र आता जिल्ह्यातील एकूण 5555 अंगणवाड्या स्मार्ट बनल्या असून सर्वच अंगणवाडी सेविकांना मोबाइलचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यामध्ये कॉमन ऍप्लिकेशन सॉप्टवेअर (कॅस) प्रणालीवर अपलोड करून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील 5555 अंगवाड्यांमध्ये 4801 मोठ्या तर 754 मिनी अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाडीतील सेविका हे मोबाइल देण्यात आलेले असून दर तीन महिन्याला त्यांना नेटसाठी चारशे रुपये दिले जात आहे. मात्र या मोबाइलसाठी नेट कोणत्या प्रकराचे वापरायचे याचे बंधन ठेवण्यात आलेले नाही. अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्षेत्रात ज्या कंपनीचे नेट चांगले चालत असेल ते नेट वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या कॅस प्रणाणीवर अंगणवाडी सेविका अंगणवाडी कितीला उघडली व कितीला बंद झाली, किती स्तनदा व गर्भवती मातांची नोंदणी झाली याची माहिती तालुक्यासह जिल्हा व राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या संगणकासह मोबाइलवर मिळत आहे. ही प्रणाली सुरु होऊन ती सुमारे चार महिन्यांचा कालावधी झालेला आहे. विशेष म्हणजे ही प्रणाणील वापरण्यात जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे.
कॅस प्रणालीमुळे ग्रामपंचायतीची कामे वेगाने होऊ लागलेली आहे. पेपरलेस ग्रामपंचायतीमुळे कागदावरील खर्चात बचत होणार असून पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल.
संजय कदम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण
सोशल मीडियाला नो एन्ट्री
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाइलवर व्हॉटस्ऍप, फेसबुक, हाइक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाला नो इंट्री आहे. हे सॉप्टेवअर डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तरी मोबाइल हॅंग होतात. त्यामुळे या मोबाइलवर सोशल मीडियाला नो इंट्री आहे.