पुणे – जमीन विषयक दाव्यांची सुनावणीसाठी पक्षकार व वकील यांना सकाळपासून थांबावे लागते. आपल्या केसचा नंबर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष असते. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होते. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून “ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड’ हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे.
या ऍपच्या माध्यमातून मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे महसूल विषयक दाव्यांची आज सुनावणीसाठी कोणता बोर्ड, सुनावणी होणार आहे की नाही. केसची सुनावणी किती वाजता होणार आहे, सध्या कोणत्या केसची सुनावणी सुरु आहे, याची माहिती मिळत आहे. या सुविधेमुळे नागरिकांना मोबाईल ऍपवर केसची सद्यस्थितीची माहिती मिळत आहे. ही सुविधा देशात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
महसुलविषयक दावे मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होतात. या अधिकाऱ्यांकडे या दाव्यांवर सुनावणी होते. या अधिकाऱ्यांकडे दाखल होणाऱ्या केसेसची संख्याही मोठी असते. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषत: ग्रामीण भागातून नागरिकांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे.
तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी येताना नागरिकांना एक ते दीड तासांचा प्रवास करून यावे लागते. सकाळी सुमारे 11 वाजता बोर्ड सुरू होते. मात्र सकाळपासूनच पक्षकार व वकिलांची गर्दी होण्यास सुरुवात होते. प्रत्यक्षात दोन वाजता केसची सुनावणी होणार असली तरी नागरिक सकाळपासून उपस्थित राहतात. हे चित्र बदलण्यासाठी तसेच पक्षकार व वकिल यांचा वेळ वाचविण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी “ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड’ हे ऍप बनविले आहे. एका सुनावणीला तीन मिनिटे लागतात. त्यानुसार या ऍपवर वेळ दिली जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेनुसारच नागरिक सुनावणीसाठी उपस्थित राहतात. एखादवेळी काही कारणाने सुनावणी होणार नसेल तर त्याची माहिती ऍपवर दिली जाते. यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत नाही. त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होते.
नागरिकांच्या सोयीसाठी –
नागरिकांच्या सोयीसाठी “ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड ऍप तयार केले आहे. जिल्ह्यात महसूलविषयक दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या 125 अधिकाऱ्यांकडील केसची सद्यस्थिती यामुळे समजते. या सुविधेमुळे केसचा लाव्हई बोर्ड आणि मोबाईलवर सुनावणीची वेळ समजते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. या सुविधेचा वकील आणि पक्षकारांना फायदा होत आहे, सुनावणीसाठी वकील व पक्षकारांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
ऍपची वैशिष्ट्ये
*मंडल अधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्याकडील केसचा बोर्ड लाईव्ह.
*ऍपवर केस क्रमांक टाकल्यास केसची सध्यस्थिती समजते.
*केसची पुढील तारीख कधी आहे हे माहीत होते.
*केसचा निकाल झाला असल्यास त्याची माहिती मिळते.
*सुनावणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता उद्या होणाऱ्या केसचा बोर्ड ऍपवर उपलब्ध.
*केसची माहिती घेण्यासाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही.