पुणे – रायगड किल्ल्याचा इतिहास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचा इतिहास नागरिकांना समजणार आहे. किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मोबाइल अॅपच्या माध्यमातून ऐकता आणि पाहता येणार आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महारांजाचा इतिहास, ऐतिहासिक कागदपत्रे, चित्रे, महत्त्वपूर्ण दस्तावेज आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्याचे मूळ स्वरुप आभासी पद्धतीने पाहता येणार आहे.
रायगड विकास प्राधिकरण व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) यांच्यात रायगड किल्ल्याचा इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विषयक करार झाला आहे. देशातील एखाद्या किल्ल्यासंदर्भात होणारा देशातील पहिलाच करार म्हणावे लागेल. यावेळी रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि सीडॅकचे कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ (निवृत्त) यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे रायगडच्या विकासाला आणि पर्य़टनाला चालना मिळणार आहे.
या करारानुसार डिजिटल रिपॉझिटरी ऑनलाइन पोर्टल, मोबाइल टुरिस्ट गाइड, किऑस्क अॅप्लिकेशन आणि व्हर्च्युअल रिस्टोरेशन अँड वॉक थ्रू ऑफ द फोर्ट अशा चार प्रमुख घटकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पानुसार गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित राज्यातील, देशातील सर्व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व ऐतिहासिक कागदपत्रे आता एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प किल्ले रायगडच्या पायथ्याशी ८८ एकरमध्ये उभ्या राहणाऱ्या शिवसृष्टी व मराठा संशोधन केंद्राचा भाग असेल.” – संभाजीराजे छत्रपती, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण