मुंबई – निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी राऊत यांनी शहांवर कडाऊन टीका केली. यावेळी राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे.
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर तळवे चाटण्याबाबतची टीका केली होती. काल पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांना पत्रकाराने अमित शहा यांनीं केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला.त्यावेळी राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत माध्यमांबाबत देखील सवाल उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांच्या टीकेचा व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. “भर पत्रकार परिषेदेत अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे पण उलट पक्षी हि बातमी कशी दाबता येईल हाच प्रयत्न चालू आहे दुर्दैव महाराष्ट्राचं आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच.”
भर पत्रकार परिषेदेत अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे पण उलट पक्षी हि बातमी कशी दाबता येईल हाच प्रयत्न चालू आहे दुर्दैव महाराष्ट्राचं आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच. pic.twitter.com/eWhjaUEQyq
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 19, 2023
शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना अनेक नेत्यांकडून टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.