मंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाडक्या जेम्स नावाच्या श्वानाचे काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. वयोमानामुळे जेम्सचे निधन झाले आहे. जेम्सच्या निधनामुळे राज ठाकरे दु:खी झाल्याचे बघायला मिळाले आहे.
जेम्स हा ग्रेट डेन प्रजातीचा असून गेली अनेक वर्षापासून तो राज ठाकरे यांच्या सोबत राहत होता. मात्र जेम्सचं अचानकपणे निधन झाल्यामुळे ठाकरे यांना एक प्रकारे भावनिक धक्का बसला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन या श्वानांचं यापूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर आता जेम्सही ठाकरे परिवाराला सोडून गेला. विशेष म्हणजे राज ठाकरे व त्यांचे कुटुंबीय श्वानांवर विशेष प्रेम करतात हे अनेकदा फोटो आणि व्हिडीओमधून पाहण्यात आले आहे. बॉन्ड, शॉन आणि जेम्सव्यतिरिक्त त्यांच्याकडे कन्या, मुसाफा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू (हस्की) हे श्वान आहेत.
जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात.