शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा

चंडीगढ – हरियाणातील भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) एकमेव आमदार अभयसिंह चौताला यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आमदारकीचा त्याग करत असल्याचे त्यांनी म्हटले.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र असणारे अभयसिंह राजीनामापत्र सादर करण्यासाठी विधानसभेच्या आवारात ट्रॅक्‍टरमधून पोहोचले. त्यांनी याआधीच हरियाणा विधानसभेच्या सभापतींना पत्र पाठवून आमदारकीचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केले होते.

मोदी सरकारने 26 जानेवारीपर्यंत कृषी कायदे मागे घेतले नाहीत; तर माझ्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावे. लोकशाहीशी विसंगत मार्गाने मोदी सरकारने काळे कायदे लादले. त्या कायद्यांना संपूर्ण देशातील शेतकरी विरोध करत आहेत, असे अभयसिंह यांनी त्या पत्रात म्हटले होते.

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्यामध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही राज्यांतील वातावरण आधीपासूनच ढवळून निघाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.